लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी होत आहे. अमरावतीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे आणि सोलापूरचे काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी सभा घेणार आहेत.अमरावती मतदार संघातील इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथील भारत जोडो मैदानावर सकाळी ११ वाजता राहुल गांधी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. तर सोलापूर मतदार संघातील काँग्रेस इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरातील एक्झीबिशन ग्राउंडवर ४ वाजता प्रचार सभा पार पडणार आहे.
या प्रचारसभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच राहुल गांधी सोलापूर जिल्ह्यात येत आहेत. सोलापूरची विमानसेवा बंद असल्याने ते सिंहगड महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर उतरणार आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्त सोलापूर शहर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जागोजागी तैनात करण्यात येणार आहे. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय ते सभेचे ठिकाणी या रस्त्यावर पोलिस बंदोबस्त असणार आहे.
राहुल गांधी सोलापूर दौऱ्यावर असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी नेमलेले सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट व १८ अधिकारी सोलापूर शहरात दाखल झाले आहेत. त्यांनी देखील हेलिपॅडसह सभेच्या ठिकाणाची पाहणी केली आहे. राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील साडेबाराशे पोलिस अंमलदार, पाचशे होमगार्ड, तीन पोलिस उपायुक्त, सात सहायक पोलिस उपायुक्त, जवळपास १०० पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक असा पोलिस बंदोबस्त लावला जाणार आहे.
अमरावतीच्या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, खासदार चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख, जयश्री वानखडे, यांच्यासह घटक पक्षातील नेते उपस्थित असतील.