लोकसभा निवडणूक ऐन रंगात आली आहे . पहिला टप्पा पार पडला असून दुसरा टप्प्याचा प्रचार आज थंडावणार आहे. राज्यात सर्वपक्षीय नेत्यांच्या सभांचा, प्रचाराचा धडाका जोरदार सुरु आहे. मात्र त्यात सर्वात उठून दिसणारी बाब म्हणजे पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात लावलेल्या सभांचा धडाका. मोदींनी चंद्रपूर, रामटेक, वर्धा, नांदेड, परभणीत सभा घेतल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवसांत मोदी महाराष्ट्रात 7 सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजप, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या दिग्गज नेत्यांची फळी प्रचारात उतरवली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने तर अबकी बार चारसौ पारचा नारा देत महाराष्ट्रात मिशन 45 निश्चित केले आहे.
पुण्यासह सातारा, लातूर, सोलापूर आणि माढा अशा पाच मतदारसंघामध्ये या सभा होणार आहेत. याआधी २७ एप्रिलला पंतप्रधान गोव्यात असतील आणि भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांसाठी ते वास्को येथे जाहीर सभा घेतील असे सांगण्यात आले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार मोदी पुण्यात सोमवारी (२९ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. ही सभा एस. पी. कॉलेजच्या मैदानावर होण्याची शक्यता आहे.तसेच यावेळी पुण्यात मोदी रोड शो करतील असेही सांगितले जात आहे. याच दिवशी दुपारी तीन वाजता लातूर येथे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याच दिवशी सातारा लोकसभेच्या निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी मोदी पाऊणला सभा घेतील असे सांगितले जात आहे.
३० एप्रिलला सोलापूरचे भाजपचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) आणि माढा लोकसभा (Madha Loksaba) मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकरांसाठी (Ranjeetsingh Nimbalkar) पंतप्रधान सभा घेणार आहेत.
यातील बहुतांश सभांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत .