देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण अकोला लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने, वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
अकोल्यात महायुतीने भाजपकडून अनुप धोत्रे यांना तर महाविकास आघाडी म्हणजेच काँग्रेसने डॉ. अभय पाटील आणि वंचित बहुजन आघाडीकडून अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर स्वतःच लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. अकोल्यात तिरंगी लढत होणार हे नक्की आहे. तर अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुसऱ्यांदा अकोला दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे प्रचार हा शिगेला पोहोचला आहे. तसेच महायुतीने सर्व जागा जिंकण्यासाठी आपले स्टार प्रचारक मैदानात उतरवल्याचे दिसून येत आहे.
तीनही उमेदवारांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. लोकांच्या भेटीगाठी, मेळावे, कॉर्नर सभा, जेवण अन्य कार्यक्रम घेतले जात आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व काही पर्यंत केले जात असल्याचे दिसून येत आहे. २६ तारखेला या ठिकाणी मतदान होणार आहे. २३ तारखेला अमित शहांची सभा होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत. डॉ. अभय पाटील यांच्यासाठी देखील काँग्रेसकडून राष्ट्रीय नेते मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभा घेतल्या आहेत. तर वंचितच राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे स्वतःच प्रचारसभा घेऊन मतदारांना आवाहन करत आहेत. सुजात आंबेडकर आणि प्रा. अंजली आंबेडकर हे अकोला मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
प्रचार सभांमधून तीनही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे. भाजपा देशहित , गेल्या १० वर्षांतील विकासकामे या मुद्द्यांवर जोर देत आहे. तर काँग्रेस आणि वंचित बहुजन पार्टीचा प्रचार हा अकोल्यातील प्रश्न व समस्या या भोवती फिरताना दिसत आहे. वंचित आणि काँग्रेस एकमेकांवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप कायमच करताना दिसते.
वंचित बहुजन आघाडीने राज्यात ४ मुस्लिम उमेदवार दिले आहेत. तर काँग्रेसने मुल्सिम उमेदवार दिले नसल्याची टीका वंचित बहुजन आघाडीने केली आहे. अकोल्यात जातीय समीरकणावर उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. हिंदू, मुस्लिम ,दलित, ओबीसी, माळी, धनगर, आदिवासी, बंजारा आदी बहुसंख्य मतांची मतपेढी कुणाकडे वळते? यावर देखील कोण जिंकणार हे ठरणार आहे. सर्व समाज आपल्या बाजूने कसा उभा राहील यासही प्रचाराचे डावपेच खेळले जात आहेत. त्यामुळे अकोल्याची लढत ही रंगतदार होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत अकोल्याची जनता कोणाला साथ देते हे ४ जून रोजी स्पष्ट होणार आहे.