लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा पार पडला असून दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी, 26 एप्रिल रोजी पार पडत आहे. निवडणूक प्रचाराला जोर आला असून अनेक ठिकाणी प्रचारसभा, बैठका आणि रो शोचं आयोजन केले जात आहे. या प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याबरोबरच मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्याच पक्षाला मतदान करावे यासाठी प्रत्येक नेता प्रयत्न करत आहे. अशाच एका प्रचारसभेत बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मतदारांना मतदानासाठी आवाहन करत चमत्कारिक भाष्य केले आहे.
आपल्या घरच्या मैदानात म्हणजेच कर्नाटकमधल्या कलबुर्गीमध्ये मतदारांशी संवाद साधताना खर्गे म्हणाले की, “यावेळेस काँग्रेसच्या उमेदवाराला तुम्ही मतं दिली नाहीत तर मी असे समजेन की कलबुर्गीत माझं काहीही स्थान राहिलेलं नाही. मी तुमचा विश्वास जिंकू शकलो नाही असं मी समजेन. मी एक आवाहन करु इच्छितो, तुम्ही काँग्रेस उमेदवाराला मत द्या किंवा देऊ नका मात्र मी कलबुर्गीसाठी काही केलं असेल असं तुम्हाला वाटत असेल तर किमान माझ्या अंत्यसंस्काराला तरी या,” असे विधान खर्गे यांनी यावेळी केले आहे.
मात्र यापुढच्या वाक्यात “मी राजकारणातून कधीही संन्यास घेणार नाही. देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मी कार्यरत राहणार आहे.राजकारणात आलो आहे तो भाजपा आणि संघाच्या विचारधारेचा पराभव करण्यासाठीच,” असेही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले आहेत.
मल्लिकार्जुन खर्गेनी 2009 आणि 2014 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली होती. मात्र 2019 मध्ये ते पराभूत झाले होते. .कलबुर्गीमधून यंदा काँग्रेसने त्यांचे जावई राधाकृष्ण दोदमणाई यांना उमेदवारी दिली आहे. राधाकृष्ण हे सध्याचे भाजपाचे खासदार उमेश जाधव यांच्याविरोधात निवडणूक लढणार आहेत.त्यामुळे खर्गे सध्या जावयासाठी प्रचार करताना दिसत आहे. अफजलपूर या ठिकाणी जावयासाठी आयोजित रॅलीदरम्यान बोलत असताना खर्गेनी जनतेशी संवाद साधलेला दिसून आला आहे.