लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान एनडीए कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे इतर स्टार प्रचारक देशभरात प्रचार सभा घेत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस जाहीरनाम्यावर आणि त्यांच्या काळातील मुद्द्यांवरून टीका करताना दिसून येत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुरैना येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी काँग्रेसच्या काळात जवानांबाबत असलेल्या धोरणांवरून टीका केली आहे.
मुरैना येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”भाजपासाठी देशापेक्षा काहीही मोठे नाही. तर दुरीकडे काँग्रेससाठी फक्त परिवार महत्वाचा आहे. जो देशासाठी त्याग करेल, समर्पण करेल, मेहनत करेल त्याला कायम मागे ठेवायचे ही काँग्रेसची नीती आहे. यामुळेच अनेक वर्षे काँग्रेसने आपल्या शूर जवानांसाठी वन रँक वन पेन्शन योजना सुरु केली नाही.”
पुढे बोलताना मोदी म्हणाले, ”भाजपचे सरकार येताच ‘वन रँक वन पेन्शन’ लागू करण्यात आली. सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकांच्या सुविधांची आम्हाला काळजी वाटत होती. ज्या सैनिकांचे हात काँग्रेस सरकारने बांधले होते, ते बंधन आम्ही तोडले आहे. आम्ही म्हटले की एक गोळी आली तर १० गोळ्या झाडा. ते तोफेचा एक गोळा डागत असतील तर तुम्ही १० तोफेचे गोळे सोडा.” २६ एप्रिल म्हणजेच उद्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. १३ राज्यांतील ८८ जागांवर हे मतदान होणार आहे. दरम्यान काल संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत.