लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान एनडीए कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे इतर स्टार प्रचारक देशभरात प्रचार सभा घेत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस जाहीरनाम्यावर आणि त्यांच्या काळातील मुद्द्यांवरून टीका करताना दिसून येत आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आग्रा येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. आग्रा येथील सभेची सुरुवात मोदींनी राधे-राधे अशी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला संबोधित करताना म्हणाले, ”पूर्वी इथे यायचो तेव्हा काहीतरी द्यायला यायचो. काहीतरी आणायचो, पण आज काहीतरी मागायला आलोय. आज मी विकसित भारतासाठी तुमच्याकडून आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. भारताचा विकास झाला तर ते तुमच्या आणि तुमच्या मुलांसाठी फायदेशीर ठरेल. काही शक्तींना भारताची वाढती शक्ती आवडत नाही. येथे डिफेन्स कॉरिडॉर बनवला जात आहे. स्वावलंबी भारत आणि निर्यातीसाठी हे महत्त्वाचे आहे. जुन्या सरकारमधील शस्त्र दलाल अडचणीत आले आहेत. भारतात शस्त्रास्त्रे बनवण्याचा प्रश्न येतो तेव्हा ते घाबरतात. भारताने स्वावलंबी व्हावे असे त्यांना वाटत नाही. मोदींना रोखण्यासाठी ते एक झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा एनडीएचे सरकार आणणे गरजेचे झाले आहे.”