लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे उलटले तरी काँग्रेसला लागलेली घरघर थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत, उलट मुंबई काँग्रेसमधले बरेच नेते अंतर्गत कलहामुळे आणि महाविकास आघाडीच्या हस्तक्षेपामुळे नाराज असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेसमधल्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरुपम आणि अशोक चव्हाण या चार बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडत मोठा धक्का दिला होता.
आता लोकसभा निवडणूक ऐन भरात असताना आता मुंबई काँग्रेसच्या वर्तुळातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असणारे नसीम खान (Naseem Khan) हेदेखील हायकमांडवर प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे नसीम खान यांनी पक्षाच्या प्रचार समिती आणि स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. नसीम खान यांनी आपला राजीनामा थेट हायकमांडला पाठवला आहे.
त्यांच्या नाराजीचे कारण नुकतीच जाहीर झालेली वर्षा गायकवाड यांची उमेदवारी आहे. नसीम खान हे उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र, याठिकाणी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नसीन खान हे प्रचंड नाराज असल्याचे कळत आहे. उत्तर मध्य मुंबईसाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्या नावाला पसंती देण्यात आली हे कारण त्यामागे आहे.
याआधी गायकवाड दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने त्या नाराज असल्याची चर्चा सुरू होती.त्यासाठी वर्षा गायकवाड यांनी दिल्लीचा दौरा देखील केला होता. मग त्यांचे मन राखण्यासाठी त्यांना उत्तर मुंबई मतदार संघाची उमेदवारी देण्यात आली.
मात्र यामुळे नाराज झालेल्या नसीम खान यांनी थेट पक्षाच्या प्रचार समिती आणि काँग्रेसच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी दिल्लीत हायकंमाडकडे पाठविला आहे.याचे कारण पक्षाने महाराष्ट्रात एकही अल्पसंख्याक उमेदवार दिलेला नाही हे आहे.
नसीम खान यांनी हायकमांडला उद्देशून म्हंटले आहे की , “तीन महिन्यांपूर्वी पक्षाने मला उत्तर-मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले होते.मात्र ता काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात एकाही जागेवर मुस्लीम उमेदवार उभा केलेला नाही. मुस्लिमांची मतं हवीत पण मुस्लीम उमेदवार नको, असे कसे चालू शकते? उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी नाकारली गेल्यानंतर आता मी मुस्लीम समाजासमोर कोणत्या तोंडाने जायचे? काँग्रेस पक्षाच्या या निर्णयावर मुस्लीम समाज नाराज आहे, मीदेखील नाराज आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो”.
एकूण लोकसभा निवडणुकीच्या काळात एका नेत्याची नाराजी दूर करावी तर दुसऱ्याचे मन दुखावते असा प्रकार काँग्रेसमध्ये चालू असल्याचे दिसत आहे. परिणामी होत असलेली नेत्यांची गळती काँग्रेसला शेवटाकडे लवकर घेऊन जाणार अशी चिन्हे दर्शवणारी आहे.