पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथेकाल केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) टाकलेला छापा आणि तेथे सापडलेल्या विदेशी शस्त्रास्त्रांवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) संदेशखाली येथील छापेमारीच्या घटनेची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली असून, हा राज्याला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे, तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या अटकेची मागणी सुरू केली आहे. भाजप नेते पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा सल्ला देत आहेत.
शुक्रवारी सीबीआयच्या छाप्यानंतर तृणमूल काँग्रेसने शनिवारी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सीबीआयवर बंगालची बदनामी करण्यासाठी हा छापा टाकला गेला असल्याचा आरोप केला आहे. सीबीआय विरोधात तक्रार दाखल करताना, टीएमसीने म्हटले आहे की लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाची प्रतिमा खराब करण्यासाठी मतदानाच्या दिवशी पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील एका रिकाम्या जागेवर हा तथाकथित छापा टाकण्यात आला.
दुसरीकडे, सीबीआयच्या छाप्यात विदेशी शस्त्रे सापडणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुभेंदू अधिकारी यांनी ममता सरकारवर निशाणा साधला आहे. शुभेंदू अधिकारी यांनी संदेशखाली मध्ये सापडलेली शस्त्रे विदेशी असून, ती देशविरोधी कारवायांमध्ये वापरली जात असल्याचे म्हटले आहे. शुभेंदू अधिकारी म्हणाले की, टीएमसीचे माजी नेते शाहजहान शेख हे दहशतवादी आहेत.तसेच ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री राहण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजप नेते आणि बेगुसरायचे खासदार गिरिराज सिंह यांनी संदेशखालीमध्ये शस्त्रास्त्रे सापडल्याप्रकरणी ममता सरकारवर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार गुन्हेगारांच्या बळावर चालते, जिथे विशेषत: मुस्लिमांना प्राधान्य दिले जाते . असा आरोप त्यांनी केला. त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.
संदेशखाली प्रकरणातील आरोपी आणि निलंबित टीएमसी नेता शाहजहान शेखचा जवळचा सहकारी अबू तालेब मोल्लाशी संबंधित दोन ठिकाणी अधिकाऱ्यांनी छापे टाकले. या काळात तालेबच्या अड्ड्यांमधून 4 विदेशी पिस्तूल, 1 भारतीय पिस्तूल, 1 भारतीय रिव्हॉल्व्हर आणि 1 पोलिस कोल्ट रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे. याशिवाय 348 काडतुसे आणि अनेक देशी बनावटीचे बॉम्बही जप्त करण्यात आले आहेत.
सीबीआयला संशय आहे की अबू तालेबच्या घरातून जी काही शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत, ती आधी शाहजहान शेखच्या घरी लपवून ठेवण्यात आली होती, परंतु ईडीने शाहजहान शेखवर केलेल्या कारवाईत ही शस्त्रे शाहजहानच्या घरातून अबू तालेबच्या घरी हलवण्यात आली होती .