महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत दोन टप्प्यात १३ जागांवर मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे ला होणार आहे. दरम्यान राज्यात बारामती नंतर माढा आणि सोलापूरची निवडणूक महायुतीची धाकधूक वाढविणारी आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने या दोन्ही जागा जिंकल्या होत्या. यंदा त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीमधील इतर पक्षांची साथ देखील मिळणार आहे. मात्र यंदाची स्थिती थोडीशी विचित्र आहे. भाजपा सहज जिंकले असे वाटत असताना शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना आपल्या बाजूला वळल्याने आता येथील राजकारण बदलले आहे. दरम्यान या जागा जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या शिलेदारांवर महत्वाची जबाबदारी सोपविली आहे.
सोलापूरमध्ये भाजपचे राम सातपुते आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यात लढत होणार आहे. तर माढ्यात रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी माढ्यात आमदार प्रसाद लाड आणि सोलापुरात श्रीकांत भारतीय यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. हे दोघेही ७ मे पर्यंत सोलापूर आणि माढ्यात तळ ठोकून बसणार आहेत. यामध्ये प्रचाराची आणि इतर गोष्टींचे नियोजन केले जाणार आहे. हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आणि भाजपाने आपली ताकद पणाला लावल्याचे दिसून येत आहे.