लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. हातकणंगले आणि कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापुरातील सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विकासाच्या आणि अन्य मुद्द्यांवरून विरोधकांवर टीका केली आहे. यावेळी नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली आहे.
कोल्हापूरच्या सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या आदर्शांची भूमी आहे. याना सर्वाना माझा प्रणाम. विकासाच्या मुद्द्यावर बरोबरी करता येत नाही म्हणून इंडिया आघाडीने आपली रानटी बदलली. त्यानंतर त्यांनी तुष्टीकरणाची बाजू घ्यायला सुरुवात केली. हे म्हणतात यांचे सरकार आल्यास कलम ३७० व सीएए कायदा रद्द करणार असे म्हणतात.”
यापुढे बोलताना मोदी म्हणाले, ”जगात भारी कोल्हापुरी. अयोध्येत ५०० वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अनेक वर्ष मंदिराचा विरोध करणाऱ्या काँग्रेसने राम मंदिर झाल्यानंतर देखील बहिष्कार केला. डीएमके पक्षाचे नेते सनातन पक्षाला नावे ठेवतात. यांच्या अशा अजेंड्यामध्ये नकली शिवसेना यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालत आहेत. आज यामुळे बाळासाहेब ठाकरेंना किती दुःख होत असेल. ” दरम्यान महायुतीने लोकसभा निवडणुकीसाठी हातकणंगले मतदारसंघातून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना तिकीट दिले आहे. तर कोल्हापुरातून देखील विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना तिकीट देण्यात आले आहे. ७ मे या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.