पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये सभांचा धडाका लावला आहे. त्यातही महाराष्ट्रात जाहीर सभा घेण्यावर त्यांचा जास्त भर दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातल्या 5 जागांसाठी मतदान पार पडले होते तेव्हा मोदींनी चंद्रपूर, रामटेक आणि वर्ध्यात सभा घेतल्या होत्या, . दुस-या टप्प्यासाठी मोदींनी नांदेड, परभणी, अमरावतीत सभा घेतल्या होत्या . आता राज्यातल्या उर्वरित तीन टप्प्यातल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज त्यांच्या पुणे, सोलापूर आणि साता-यात सभा होत आहेत.
पुण्यात आज, बारामती, शिरूर, मावळ, पुणे लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज संध्याकाळी रेस कोर्स येथे संध्याकाळी ६. वाजता जाहीर सभा होणार आहे, यासाठी सुमारे २ लाख नागरिक उपस्थित असतील असे सांगण्यात येत आहे. मेट्रो प्रकल्प, पुणे शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त मागील वर्षभरात पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात दोनदा दौरे झाले आहेत. त्यानंतर ते आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर येत आहेत.
या सभेच्या निमित्ताने महायुतीनेही जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु केली आहे. कराड येथील सभा संपवून मोदी सायंकाळी साडे पाच वाजता हेलिकॉप्टरने रेसकोर्स येथील सभेच्या ठिकाणी दाखल होणार आहेत.पुण्यातील सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीमधील घटक पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेही ह्या सभेला हजर असतील असे सांगितले जात आहे. आजच्या सभेनंतर मोदी यांचा राजभवन येथे मुक्काम असणार आहे.
भाजपच्या एक्स हँडलनुसार, पंतप्रधान मोदी आज कर्नाटकातील बागलकोटमध्ये दुपारी 12.15 वाजता भाजपच्या जाहीर सभेला संबोधित करतील. येथून पंतप्रधान महाराष्ट्राला रवाना होतील. महाराष्ट्रात ते सर्वप्रथम सोलापूरला जाणार आहेत. दुपारी 2:15 वाजता सोलापुरात भारतीय जनता पक्षाच्या जाहीर सभेला पंतप्रधान संबोधित करणार आहेत. यानंतर पंतप्रधान साताऱ्यात पोहोचतील. त्यांची जाहीर सभा येथे दुपारी साडेचार वाजता होणार आहे. अखेर पंतप्रधान मोदी पुण्यात पोहोचणार आहेत. संध्याकाळी 6.30 वाजता ते येथे भारतीय जनता पक्षाच्या विशाल जाहीर सभेला संबोधित करतील.