पुण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. पुण्यात रेसकोर्सच्या मैदानावर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जवळपास २ लाख नागरिक सभेला उपस्थित राहणार असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चार लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी मैदानात उतरले आहेत.पुणे शहर भाजप आणि जिल्हा भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. दिग्विजय योद्धा पगडी असे या पगडीला नाव देण्यात आले आहे. भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदींचा दिग्विजय योद्धा पगडी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. पुण्याचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने ही पगडी मोदींना देण्यात येणार आहे. पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून ही विशेष पगडी तयार करण्यात आली आहे.
मुरुडकर यांच्या वतीने सुरेख अशी लाल रंगाची पारंपरिक पुरातन पद्धतीने हाताने बांधलेली पगडी तयार करण्यात आली आहे. हवा खेळती रहाण्याची सोय आहे. पंचधातूचा वापर करून बनवलेली शुभ चिन्हे, आई तुळजाभवानीची प्रतिमा पगडीवर आहे. ही पगडी एअर कंडीशनचे काम करेल असे सांगण्यात आले आहे. रिसर्च टीमने पूर्ण अभ्यास करुन ही पगडी तयार केली असल्याचे मुरुडकर यांनी सांगितले आहे. दिग्विजयाला साजेसे सात घोड्यांचा राजेशाही स्टॅन्ड असणारी मराठा योद्धांच्या पराक्रमाची साक्ष देणारी मराठा दिग्विजय पगडी मोदी यांच्या सन्मान करण्यासाठी बनवण्यात आली आहे.