लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या काही जागांचा अजूनही सुटलेला दिसत नाहीये. त्यातील हायव्होल्टेज खेळ सुरु आहे तो म्हणजे नाशिकच्या जागेवरून. या ठिकाणी महायुतीच्या तीनही पक्षांनी दावा ठोकला आहे. दरम्यान हेमंत गोडसे, छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरु होती. मात्र अजूनही उमेदवार कोण हे स्पष्ट झालेले नाहीये. दरम्यान महाराष्ट्र भाजपाचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन अचानक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने गिरीश महाजनांची भेट घेतली आहे.
नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र हा अर्ज शिवसेनेकडून दाखल केल्याचे त्यांनी म्हटले होते. यामुळे महायुतीत एकच खळबळ उडाली होती. नाशिकच्या जागेचा तिढा कायम असताना संकटमोचक अशी ओळख असणारे गिरीश महाजन हे अचानक नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. नाशिकमध्ये २० मे ला मतदान होणार आहे. त्यामुळे या जागेवर महायुती कधी उमेदवार जाहीर करणार हे पाहणे आवश्यक आहे. उमेदवार जाहीर झाल्यानंतर येथे महायुती कमी दिवसांत प्रचार करून निवडून येणार का हे देखील पाहणे महत्वाचे असणार आहे.