लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक आठवड्यांपासून नाशिकमधून महायुतीची उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार यासंदर्भात संभ्रम सुरु होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे.
महायुतीकडून नाशिकचा उमेदवाराची घोषणा करण्यात आली असून नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे गेली असून इथून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिंदे गटाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हॅण्डलवरुन यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. “लोकसभा निवडणूक – 2024 साठी नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून हेमंत गोडसे यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा,” अशा कॅप्शनसहीत ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटाचे इथले विद्यमान खासदार आहेत. ते पुन्हा एकदा या ठिकाणाहून लढण्यासाठी इच्छुक होते. शिवाय तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक होते. तर भाजपकडूनही या जागेवर दावा केला जात होता. मात्र आता मंत्री छगन भुजबळ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “ठीक आहे हेमंत गोडसे यांचे नाव अपेक्षित आहे. हेमंत गोडसे सध्या विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या नावाचा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा केला होता. हेमंत गोडसे यांचं मनापासून अभिनंदन करतो. आतापासूनच प्रचाराला सुरुवात वेगात होईल”, असे भुजबळ म्हणाले आहेत. तर गोडसे यांच्या नावाच्या घोषणेनंतर भाजपकडून नाशिकच्या लोकसभा जागेसाठी इच्छुक असलेले भाजपचे दिनकर पाटील नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
दोन दिवसांपूर्वी अपक्ष निवडणूक लढवत असलेले शांतीगिरी महाराज यांनी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना शिंदेगटाकडून अर्ज भरला होता. त्यांनी गोदाघाट येथे आपल्या भक्त परिवारासह जोरदार शक्ती प्रदर्शन केले होते. त्यांच्या अर्जावर शिवसेना शिंदे गट पक्षाचा उल्लेख होता. मात्र या अर्जाबरोबर पक्षाकडून दिला जाणारा एबी फॉर्म नव्हता. म्हणूनच येथील उमेदवारीसंदर्भातील संभ्रम कायम होता. अखेर यावर आज पडदा पडला .
भारती पवार आणि हेमंत गोडसे यांचा फॉर्म भरण्याचा कार्यक्रम उद्या होणार असल्याचे सांगितले जात आहे. . देवेंद्र फडणवीस किंवा इतर काही नेते येण्याची शक्यता आहे. अर्ज भरताना मोठी मिरवणूक निघेल. संपूर्ण नाशिक मतदारसंघातील आणि दिंडोरी मतदार संघातील लोक या रॅलीला हजर असतील.