राज्यातील 48 जागांवरील महायुतीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला असून त्यांचा लोकसभा निवडणूक 2024 साठीचा फॉर्म्युला ठरला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे, डोंबिवली- कल्याणचा उमेदवाराची घोषणा झाल्यावर महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपला लोकसभेच्या सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. महायुतीत जागावाटप झाल्याने लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह ठाणे, कल्याण आणि मुंबईतील काही जागांवर महायुतीतून उमेदवार जाहीर करण्यात झाले नव्हते. ते है दोन दिवसात जाहीर झाले आहेत.
नाशिकची जागा शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांच्याकडे गेली आहे,तसेच शिवसेना शिंदे गटातून कल्याण आणि ठाणे मतदारसंघासाठी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर केले आहेत, कल्याणमधून महायुतीचे उमेदवार म्हणूनमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंसमोर वैशाली दरेकरांचे आव्हान असणार आहे. वैशाली दरेकर यांना ठाकरे गटाने तिकीट दिले आहे.
तर ठाण्यातून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा झाली आहे. म्हस्केंचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार आणि उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारेंशी होईल.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून नरेश म्हस्के यांचे नाव घेतले जाते. दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून नरेश म्हस्के एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत आणि आज अखेर त्यांना लोकसभेचे तिकीट शिवसेनेकडून देण्यात आले. आहे.
आता या लोकसभा निवडणुकीच्या समीकरणामध्ये भाजपला 28, शिंदेंच्या शिवसेनेला 15, राष्ट्रवादीला 4 तर रासपला 1 जागा देण्यात आल्या आहेत. या गणितानुसार महाराष्ट्रात महायुतीचा 28-15-4-1 असा फॉर्म्युला निश्चित झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.