पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानापूर्वी, टीएमसी आमदार हुमायून कबीर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये मुर्शिदाबादमधील भरतपूर येथील टीएमसी आमदार कबीर हिंदू समुदायाला गंगेत बुडवण्याची धमकी देताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये कबीर ‘तुम्ही ७० टक्के आणि आम्ही ३० टक्के, पण मी दोन तासांत तुम्हाला गंगेत बुडवले नाही तर राजकारण सोडेन’, असे म्हणताना ऐकू येत आहे.
या व्हिडिओनंतर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या हेतूवर भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, तृणमूलच्या आमदाराच्या या वक्तव्यामुळे हिंदूंना पूर्णपणे नष्ट करण्याच्या षडयंत्राचे संकेत मिळत आहेत.
व्हायरल झालेल्या हुमायून कबीरच्या व्हिडीओमध्ये ममता बॅनर्जींच्या खास नेत्यांपैकी एक कबीर असे म्हणताना ऐकू येत आहे की, तुम्ही (हिंदू) ७० टक्के आहात आणि आम्हीही ३० टक्के आहोत. काझीपाडाची मशीद पाडलीत तर बाकीचे मुस्लिम हातावर हात ठेऊन बसतील, हे कधीच होणार नाही. मी भाजपला सांगू इच्छितो की असे कधीही होणार नाही. दोन तासांत नदीत नाही बुडवले , तर मी राजकारण सोडेन.
यावर भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी बंगाल सरकारवर हल्लाबोल केला आहे. शक्तीपूर येथील बूथ कार्यकर्ता परिषदेत कबीर यांच्या वक्तव्यावर त्यांनी X वर लिहिले आहे की , “मुर्शिदाबादमध्ये हिंदू अल्पसंख्याक आहेत. फक्त 28 टक्के. आता त्यांच्याबरोबर जर असे केले जात असेल तर कल्पना करा, बाकी बंगालमध्ये हिंदू अल्पसंख्याक झाले तर काय होईल.?
ते पुढे म्हणाले, “पश्चिम बंगालमध्ये तुष्टीकरणाचे राजकारण आता खालच्या पातळीवर पोहोचले आहे. याचे श्रेय ममता बॅनर्जी यांना जाते. बंगालमधील हिंदू आता द्वितीय श्रेणीतील नागरिकांपेक्षाही वाईट परिस्थितीत आहेत. या आमदाराला पक्षातून हाकलून देण्याचे धाडस ती करेल का? हिंदूंच्या विरोधात सतत विष पसरवणारे हे विचारवंत एक शब्दही बोलण्याची हिंमत करू शकतात का?