नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानी दिल्लीत (१ मे) महाराष्ट्र दिनाच्या मंगल प्रसंगी ‘इये मराठीचे नगरी’ सूर आणि तालांची संगीतमय मैफिलीचे आयोजन सार्वजनिक उत्सव समिती तर्फे करण्यात आले होते. दक्षिण दिल्लीत लोधी रोडवरील इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरच्या सभागृहात जमलेल्या महाराष्ट्रीयन श्रोत्यांनी या मैफिलीत जवळपास तीन तास मराठी गीतांचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीनाताई हेजीब यांनी केले. सार्वजनिक उत्सव समितीच्या सुरुवातीच्या काळापासून समितीच्या प्रत्येक कार्यक्रमात खंबीरपणे साथसोबत करणाऱ्या पदाधिकारी निशा कुलकर्णी यांचे या जगातून निघून जाणे समितीच्या सर्वच कार्यकर्त्यांसाठी दुःखदायक ठरले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उत्सव समितीचे शिरीष, आरती, शशी कुलकर्णी यांनी आदरांजली वाहिली. संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी श्री.वीरेद्रं उपाध्ये यांनी इये मराठीचे नगरी’ कार्यक्रमाची संकल्पना असणारे श्री. विजय उपाध्ये यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि या संगीतमय मैफिलीतील सुरांचा प्रवास ‘ गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र राज्याच्या राज्यगीताने सुरू झाला.
नव्या पिढीचा व भावपूर्ण सूर असलेल्या सौरभ दप्तरदार आणि समंजस सुरांची गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांनी सूर छेडले. गणेशाला वंदन करणाऱ्या सूर निरागस हो या गीताने सुरवातीलाच वातावरण निर्मिती झाली. पाठोपाठ बोलावा विठ्ठल, त्या फुलाच्या गंधकोषी, केव्हातरी पहाटे, तोच चंद्रमा, नवीन आज चंद्रमा, डौल मोराच्या मानंचा, मळ्याच्या मळ्यामंदी, हिल हिल पोरी हिला, आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं अशा गीतांचा नजराणा पेश झाला व उपस्थितांनी वारंवार टाळ्यांच्या कडकडाटात गीतांना दाद दिली. कधी तू रिमझिम झरणारी चांद रात, यासारखे नवे गीतही सादर झाले. उपाध्ये यांनी बाजाच्या पेटीवर वाजवलेल्या सुहास्य तुझे मनास मोही व इंद्रायणी काठी या गीतांनाही टाळ्यांचा गजर झाला.
जयोस्तुते श्री महन्मंगले, या स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित गीताने कार्यक्रमाची सांगता झाली तेव्हा या गीतांची सुरावट मनात ठेवूनच दिल्लीकर श्रोते घराकडे परतले दरम्यान कार्यक्रमात सोनाली श्रीखंडे यांचे ओघवते निवेदन कार्यक्रमाची उंची वाढवणारे ठरले. त्यांनी अभ्यासपूर्ण पध्दतीने विविध संदर्भ देऊन कार्यक्रम पुढे नेला. कार्यक्रमाच्या वाद्यवृंदात अमृता ठाकूरदेसाई – की बोर्ड, अपूर्व द्रविड- तबला, अजय अत्रे- आॅक्टोपॅड या कलावंतांनी साथसंगत केली. कलावंतांचे आणि दिल्लीस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर श्रोत्यांचे बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकारी निवेदिता मदाने यांनी आभार मानले .