भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.काँग्रेस नेते अरुण रेड्डी यांना दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने शुक्रवारी रात्री उशिरा अटक केल्यानंतर त्यांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले, यानंतर त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अरुण हे ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (AICC) च्या सोशल मीडिया सेलचे राष्ट्रीय समन्वयक आहेत आणि. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात अरुण रेड्डी यांची महत्वाची भूमिका होती. अरुण रेड्डी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर ‘स्पिरिट ऑफ काँग्रेस’ नावाचं अकाऊंट सांभाळतात. अरुण रेड्डी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून शेअर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
तथापि, काँग्रेसशासित तेलंगणातील एका जाहीर सभेत आपल्या भाषणादरम्यान शाह म्हणाले होते की , “जर भाजपने येथे सरकार स्थापन केले तर आम्ही मुस्लिमांना दिलेले असंवैधानिक आरक्षण मागे घेऊ. एससी, एसटी आणि ओबीसींना हमीभावानुसार कोटा मिळेल याची आम्ही खात्री करूपण प्रसारित केलेला फेक व्हिडिओ पाहता, शाह सर्व प्रकारचे आरक्षण संपवण्याचा सल्ला देत असल्याचे सांगितले जात असल्याचे दिसते आहे.
अरुण रेड्डी यांच्या अटकेनंतर तेलंगणा काँग्रेसचे प्रभारी असलेले काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी ही अटक केंद्र सरकारने केलेल्या सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप केला आहे.
मंगळवारी, दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजेंस फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) युनिटने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा समावेश असलेला ‘डॉक्टरेड’ व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी सात ते आठ राज्यांमधील 16 लोकांना समन्स जारी केले होते. .
फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) च्या कलम 91 आणि 160 अंतर्गत हे समन्स जारी करण्यात आले होते, ज्यात संबंधित व्यक्तींना तपासात सामील होण्यास आणि पुरावा म्हणून संबंधित कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे प्रदान करण्यास सांगितले होते.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समन्स बजावण्यात आलेल्यांमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह तेलंगणातील सत्ताधारी काँग्रेसच्या सहा सदस्यांचा समावेश आहे. त्यांना,रेड्डी यांना अनेक राज्यांतील इतर व्यक्तींसह, दिल्लीतील द्वारका येथील IFSO युनिटमध्ये 1 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.