भारत पाक व्याप्त काश्मीरवरील आपला दावा कधीही सोडणार नाही. मात्र ते बळाचा वापर करून घेण्याची आवश्यकता नाही. याचे कारण तेथील नागरिक काश्मीरचा विकास पाहून स्वतःहूनच भारतात सामील होतील, असे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह एका मुलाखतीत म्हणाले आहेत. काश्मीरमध्ये ग्राउंड लेव्हलवर मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. अशी एक वेळ येईल की या ठिकाणी अफस्पा कायदा ठेवण्याची गरज पडणार नाही. हा विषय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असल्याने ते यावर योग्य निर्णय घेतील.
जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक नक्कीच होईल. मात्र ते कधी होणार याबद्दल त्यांनी काही मत व्यक्त केले नाही. ते मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले, ”मला वाटते भारताला काही करावे लागणार नाही. ज्या प्रकारे जम्मू काश्मीर बदलत आहे. त्या भागात ज्या प्रमाणे आर्थिक विकास होत आहे. तिथे शांतता निर्माण झाली आहे. त्यामुळे हे पाहता मला असे वाटते की पाक व्याप्त काश्मीरमधील नागरिक स्वतःहूनच भारतात येण्याची मागणी करतील.”