लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा तिसरा टप्पा पूर्ण झाला. आता चौथ्या टप्प्यासाठी रणधुमाळी जोरात सुरु झाली आहे. तिसऱ्या टप्प्यातील राज्यातील ११ जागांसाठी उद्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. उद्या होणाऱ्या ११ जागांपैकी माढा, सांगली, कोल्हापूर, बारामती जागांवर सर्वांचे लक्ष असणार आहे. यात महायुतीकडील सात आणि महाविकास आघाडीकडील चार जागांचा समावेश आहे
त्यात देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदार संघाचा समावेश आहे. बारामतीत एकूण 2516 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे. बारामतीच्या उद्या निवडणुकीच्या हायव्होल्टेज चुरशीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या पवार कुटुंबातली ही निवडणूक विशेष महत्वाची ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तितिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर, हातकणंगले आणि सांगलीमध्ये हाय व्होल्टेज लढती बघायला मिळणार आहे.कोल्हापुरात दुरंगी तर हातकणंगले आणि सांगलीमध्ये तिरंगी लढती या निवडणुकीच्या दरम्यान बघायला मिळतील. कोल्हापुरात काँग्रेसचे शाहू छत्रपती विरुद्ध शिंदे गटाचे संजय मंडलिक अशी दुरंगी लढत असेल तर हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील सरूडकर महायुतीचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानीच्या राजू शेट्टी मध्ये काटे की टक्कर बघायला मिळेल. सांगलीमध्ये भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटलांमध्ये सामना रंगणार आहे. रत्नागिरी मध्ये भाजपचे नारायण राणे यांच्या विरोधात ठाकरे गटाचे विनायक राऊत अशी टक्कर बघायला मिळणार आहे.
दरम्यान मतदान केंद्रावर उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्या मुळे कोणताही त्रास होऊ नये यासाठी आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य ती काळजी प्रशासनाने घेतली आहे. मतदान केंद्राचे वेगळेपण म्हणून आणि जिल्ह्यामध्ये असणारे कमी जंगल क्षेत्र यामुळे अनेक मतदान केंद्रावर मतदान झाल्यानंतर बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी मतदारांचे फुल देऊन स्वागत करण्यात येणार आहे. जवळपास बहुतेक मतदान केंद्र हे सीसीटीव्ही ना जोडण्यात आले आहेत. उष्णतेची लाट लक्षात घेऊन मतदान केंद्रावर बसण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. मंडप उभारण्यात आले आहेत. पिण्याची पाण्याची सोयही करण्यात आली आहे.पहिल्या दोन टप्प्यांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे मतदान कमी झाल्यामुळे प्रशासन आता तयारीला लागला आहे.