काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि त्यांचा मुलगा प्रियांक खर्गे यांनी आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी कलबुर्गी येथील गुंडूगुर्थी गावात मतदान केंद्रावर मतदान केले.
“सर्व व्यापारी आणि गरीब जनता मिळून यावेळी काँग्रेसला विजयी करतील. गेल्या वेळी आपल्याकडून चूक झाल्याचा जनतेला पश्चाताप होत आहे आणि ते काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून देतील,” असे खर्गे यांनी मतदानानंतर सांगितले आहे .
कलबुर्गीमधून भाजपचे डॉ उमेश जाधव यांच्या विरोधात काँग्रेसने खर्गे यांचे जावई चिरंजीव राधाकृष्ण दोड्डामणी यांना उमेदवारी दिली आहे.
मतदान केल्यानंतर प्रियांक खर्गे म्हणाले, “मला पूर्ण विश्वास आहे की काँग्रेसचे सरकार विजयी होणार आहे… मोदींच्या कार्यकाळातील ही 10 वर्षे भारतासाठी आणि कलबुर्गींसाठी विनाशकारी ठरली आहेत. लोकांची निराशा झाली आहे. आता ते प्रगतीसाठी मतदान करतील.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाल्यापासून पहिल्या दोन तासांत कर्नाटकात ९.४५ टक्के मतदान झाले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी सकाळी 9:00 वाजेपर्यंत 14.60 टक्के मतदानात पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. मध्य प्रदेशातही सर्वाधिक 14.22 टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत सर्वात कमी 6.64 टक्के मतदान झाले आहे.