पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणामधून आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात करणार आहेत. पंतप्रधान मोदी काल रात्री दक्षिणेकडील या राज्यात पोहोचले आणि त्यांनी राजभवनात मुक्काम केला.
काल ,यादरम्यान माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या कुटुंबाने हैदराबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि पी व्ही नरसिंह राव यांना भारतरत्न प्रदान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी नरसिंह राव यांचा मुलगा पी व्ही प्रभाकर राव, मुलगी बीआरएस एमएलसी वाणी देवी, नरसिंह राव यांचे जावई के आर नंदन, निवृत्त आयपीएस अधिकारी आणि माजी पंतप्रधानांचे नातू भाजप नेते एन व्ही सुभाष, हे देखील या बैठकीत उपस्थित होते.
यावेळी राव यांच्या कुटुंबाने पंतप्रधान यांच्याबरोबर संस्कृती आणि भारताच्या विकासाच्या वाटचालीसारख्या विविध विषयांवरही चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर भाजप नेते आणि माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचे नातू- एनव्ही सुभाष म्हणाले, “जेव्हा पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान आणि माझे आजोबा पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्न प्रदान केल्यानंतर फोन केला होता तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला होता. मात्र काल आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा केली , त्यावरून मला असे वाटले की पीएम मोदी आणि नरसिंह राव यांच्यात अजिबातच फरक नाही, पंतप्रधान मोदी हे मला माझ्या आजोबांसारखेच वाटले.याभेटीत नुसतेच राजकारण नव्हे तर आम्ही विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य आणि शिक्षणावरही सुमारे 30-45 मिनिटे.चर्चा केली”.
पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आज तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील वेमुलवाडा येथील श्री राजा राजेश्वर स्वामी देवस्थानम येथे प्रार्थना केली.
मंदिरात प्रार्थना केल्यानंतर पीएम मोदी तेलंगणातील करीमनगर आणि वारंगल भागात रॅली घेणार आहेत. तेलंगणातील प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान शेजारील राज्य आंध्र प्रदेशातील राजमपेट येथे सभा घेणार आहेत. यानंतर आज ते विजयवाडा येथे रोड शो करणार आहेत.