राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी आज एक गौप्यस्फोट केला आहे .काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्ष विलीन होतील असा दावा एका मुलाखतीत केला आहे. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, पवार यांच्या या वक्तव्यावरून आगामी काळात काँग्रेस आणखी मजबूत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
काँग्रेसचे नेते वडेट्टीवार बुधवारी पत्रकारांशी बोलत होते.त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवार हे मोठे नेते असून त्यांच्या वक्तव्याचा खोलवर अर्थ आहे.
तसेही “शरद पवार साहेब मूळ गांधी विचारांचे आहेत. गांधी विचार कोणी संपवू शकत नाही. काही पक्ष हे अवकाळी पावसासारखे आहेत. अवकाळी पाऊस जनमाणसाला उद्धवस्थ करून जातो, तशी आताच्या सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे. परंतु काँग्रेस हा निरंतर वाहणाऱ्या नदीसारखा पक्ष आहे. ज्या विचारांनी हा पक्ष उभा झालेला आहे.
सध्या काँग्रेसच्या मागे जनता उभी असल्याचे दिसून येत आहे. पवार साहेबांच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्यांना फार दूरच अभ्यास असतो. त्यांना दूरदृष्टी आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असे शरद पवार यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले आहे. शरद पवार यांनीही मात्र आपल्या पक्षाबाबत आत्ताच काही सांगू शकत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय घाईघाईने कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असे स्पष्टीकरण दिले आहे.
शरद पवारांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, “प्रादेशिक पक्ष स्वबळावर चालत आहेत. निवडणुकीनंतर असे काही होईल, असे मला वाटत नाही, राजकारणातील चढ-उतारांचा अंदाज बांधणे कठीण असले तरी प्रादेशिक पक्ष आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतील.”असे म्हणत भुजबळ यांनी शरद पवार यांच्या वक्तव्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे.