देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने, वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
सांगलीत यंदा तिरंगी लढत होणार असली तरीही मुख्य लढत ही भाजपाचे संजय काका पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात होणार आहे. चंद्रहार पाटील हे मतदान आपल्या बाजूने मिळवतील ते कोणाला फायद्याचे ठरते ते ४ तारखेला कळेलच. तर महायुतीने सांगलीत विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र महाविकास आघडीत या जागेवरून किती नाराजीनाट्य आणि वादविवाद झाले ते आपण पहिले आहेत. या वादामुळेच काँग्रेसच्या विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सांगली हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या घराण्यानेच या जागेवर प्रतिनिधित्व केले आहे. मात्र २०१४ च्या मोदी लाटेत संजय काका पाटील यांच्या रूपाने भाजपाने ही जागा जिंकली.२०१९ च्या तिरंगी लढतीत देखील संजय काका पाटील हे पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले. यंदा देखील २०२४ मध्ये भाजपाने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना तिकीट दिले आहे.
कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसने दावा केल्याने ठाकरे गटाने ही जागा आपल्या पदरात पाडून घेतली. मात्र त्यानंतर काँग्रेसमध्ये झालेले नाराजी नाट्य, आमदार विश्वजित कदमांनी अनेकदा हायकमांडची घेतलेली मागणी यावरून काँग्रेसला ही जागा सोडायची नव्हती ते पूर्ण स्पष्ट आहे. मात्र अजूनही ती नाराजी पूर्णपणे दूर झालेली दिसत नाहीये. कारण विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे याचा फटका माविआचे उमेदवार चंद्रहार पाटलांना बसण्याची शक्यता आहे.
सध्या लढत ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी दिसत असली तरीही, अपक्ष विरुद्ध भाजपा अशीच येथे लढाई होणार आहे. भाजपच्या खादारांविरुद्ध देखील पक्षांतर्गत नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. त्याचा रूपांतर मतदानात झाल्यास महायुतीच्या उमेदवाराला फटका बसू शकतो. या ठिकाणी ६ विधानसभांपैकी ३ जागा महायुतीकडे तर ३ जागा महाविकास आघाडीकडे आहेत. कागदावर ही ताकद समान आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीने विशालम पाटलांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत कोण विजयी होणारे हे पाहावे लागणार आहे.