लोकसभा निवडणुकीसाठी सर्व नेतेमंडळी प्रचारसभा घेत आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर आणि सत्ताधारी विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. राजकीय लढाई हाय लेव्हलला गेल्याचे दिसत आहे. भाजपा नेत्या आणि अमरावतीच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही वर्षांपूर्वी एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी १५ मिनिटे पोलीस हटविले तर तुम्हाला दाखवून देऊ असे विधान केले होते. आता या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी पलटवार केला आहे.
भाजप नेत्या नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना अकबरुद्दीन ओवेसी यांच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यावर १५ सेकंदाचे वक्तव्य केले आहे. नवनीत राणा म्हणाल्या, “छोटा म्हणतो, १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा मग आम्ही काय करू शकतो ते दाखवू. मी छोट्याला सांगते , तुला १५ मिनिटे लागतील. आम्हाला फक्त १५ सेकंद लागतील. जर तुम्ही १५ सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर, मग छोटा- मोठा कुठून आला आणि कुठे गेला हे कळणारच नाही.