भाजपचे सर्वोच्च नेते आणि स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र, तेलंगणा आणि ओडिशा निवडणुकीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी सार्वत्रिक निवडणुकीत 400 चा आकडा पार करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी देशभरात जोरदार प्रचार करून मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत. भाजपने आपल्या X हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा निवडणूक कार्यक्रम शेअर केला आहे.
भाजपच्या एक्स हँडलनुसार, पंतप्रधान मोदी आज पहिल्यांदा महाराष्ट्रात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. सकाळी 11:30 वाजता ते महाराष्ट्रातील नंदुरबार येथे जाहीर सभेला संबोधित करतील आणि थेट तेलंगणाला रवाना होतील. यानंतर पंतप्रधान मोदी दुपारी 3:15 वाजता तेलंगणात महबूबनगरइथे आणि संध्याकाळी 5:30 वाजता हैदराबादमध्ये जाहीर सभांना संबोधित करतील. यानंतर पंतप्रधान थेट ओडिशाची राजधानी भुवनेश्वरला पोहोचतील. येथे ते रात्री साडेआठ वाजता रोड शो करणार आहेत.
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांवर सरासरी 64 टक्के मतदान झाले. आता 13 मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. चौथ्या टप्प्यात 10 राज्यांतील 96 जागांचा समावेश आहे. ही राज्ये म्हणजे आंध्र प्रदेश, बिहार, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल आहेत