लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विरोधी पक्षापेक्षा त्यांचे स्वतःचे नेतेच मोठ्या अडचणीत आणत असल्याचे चित्र सध्या निर्माण झालेले दिसत आहे. .वारसा कर आणि भारतीयांबाबत वर्णद्वेषी वक्तव्य करणारे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्यानंतर आता आणखी एका काँग्रेस नेत्याने आपल्या वक्तव्यातून वाद निर्माण केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी अचानक पाकिस्तानबाबत प्रेम उफाळून आल्यामुळे त्यांनी वादग्रस्त विधान करत वाद ओढावून घेतला आहे.
सॅम पित्रोदा यांनी काँग्रेसच्या अडचणी वाढवल्यानंतर आता मणिशंकर अय्यर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
‘पाकिस्तानकडे पण अणुबॉम्ब, भारताने त्यांना आदर दाखवायला हवा ’, या त्यांच्या वक्तव्याने लोकसभेच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या व्हिडिओमध्ये अय्यर म्हणत आहेत की, “मोदी सरकार असे का म्हणते की तिथे दहशतवादी असल्याने आम्ही पाकिस्तानसोबत चर्चा करणार नाही. दहशतवादाला संपविण्यासाठी चर्चा अत्यंत गरजेची आहे. पाकिस्तान विचार करत असेल की भारत गर्विष्ठपणा दाखवत जगभरात आम्हाला हिणवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील कोणताही पागल त्यांच्याकडील अणुबॉम्बचा वापर करु शकतो.”
“पाकिस्तान हा सार्वभौम देश आहे, त्यांचाही आदर केला पाहिजे. तिथे कोणी वेडा सत्तेवर आला तर आपल्या देशाचे काय होईल? त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत. आमच्याकडेही आहे, पण लाहोर स्टेशनवर काही वेड्या माणसाने बॉम्ब सोडला तर त्याची रेडिओ ॲक्टिव्हिटी आठ सेकंदात अमृतसरला पोहोचेल. जर तुम्ही त्याला ते वापरण्यापासून थांबवले, त्याच्याशी बोला, त्याला आदर दिला, तरच तो त्याच्या बॉम्बचा विचार करणार नाही, परंतु तुम्ही त्याला नाकारले तर काय होईल.” असे वादग्रस्त वक्तव्य मणिशंकर यांनी केले आहे. या व्हायरल क्लिपमध्ये अय्यर यांनी भारताने पाकिस्तानशी संवाद सुरू करायला हवा, यावर भर दिला आहे.