पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये काही मुस्लिमबहुल परिसरातून मशिदींमधून काँग्रेसला मतदान करण्याचे फतवे काढले जात आहेत. मुसलमान मतदार सुज्ञ आहे. काँग्रेस त्यांचा वापर करून घेत आहे, हे त्यांनाही माहित आहे मात्र मशिदींमधून जर अशा प्रकारचे फतवे काढले जात असतील, तर माझाही पुण्यातील हिंदू समाजासाठी ‘फतवा’ आहे. मोठ्या प्रमाणावर मतदान करून पुण्यात हिंदूंचे ‘मोहोळ’ उठु दे,’ असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यातील हिंदू समाजाला भाजपला मतदान करण्याचे भावनिक आवाहन केले आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी पुण्यात राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष जातीपातीचे गलिच्छ राजकारण करीत असल्याची टीका करत सर्व हिंदू बांधवांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन महायुतीच्या उमेदवारांना मतदान करावे, असे आवाहन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे केले आहे.
पुण्यातल्या काही राजकारण्यांनी कायम नागरिकांना जातीपातीत विभागण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच राम गणेश गडकरींचा पुतळा फोडला, जेम्स लेनचे प्रकरण बाहेर आले. शरद पवारांनी १९९९ साली ‘राष्ट्रवादी’ची स्थापना केली. तेव्हापासून महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणाचे विष कालवले जात असल्याची थेट टीका ठाकरे यांनी केली आहे. मात्र याचबरोबर अजित पवार मात्र यात कधीच सामील नव्हते असेही ठाकरे म्हणाले आहेत.
“यंदाच्या निवडणुकीला मुद्दाच नाही, म्हणून एकमेकांच्या आई बहिणींवरून शिव्या वगैरे घालत आहेत. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. हे सर्व महाराष्ट्राबाहेर चालत असेल. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.” अशी टीका राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेत केली आहे.
राज ठाकरे यांनी मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करताना त्यांना शहराच्या नियोजनावरून लगेच काही सूचनाही केल्या. खास राज ठाकरे शैलीमध्ये ‘शहर दिवसेंदिवस बकाल होत चालले आहे, त्याच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी नगरसेवक, आमदार, खासदार यांची आहे. मुरलीधर मोहोळ तुम्ही निवडून आलात, तर शहराच्या नियोजनाकडे लक्ष द्या, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, वाहतुकीचे प्रश्न सोडवा,’ अशी सूचनाही ठाकरे केली आहे .
राज ठाकरे यांच्या पुण्यातील प्रचार सभेला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ, मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे, मनसेचे अनिल शिदोरे, किशोर शिंदे, राजेंद्र वागस्कर, रणजित शिरोळे, आशिष देवधर, गणेश भोकरे, राघवेंद्र ऊर्फ बापू मानकर आदी उपस्थित होते.