लोकसभा निवडणुकीतील दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे १३ तारखेला पार पडणार आहे. राज्यातील १३ जागांवर मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रचाराच्या तोफा आज शांत होणार आहे. दरम्यान आज सातारा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उदयनमहाराज भोसले यांनी बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उदयनमहाराज भोसले यांनी पंकजा मुंडे यांना निवडून देण्याचे आवाहन केले. बीडमध्ये ओबीसी-मराठा हा वाद पेटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे थेट छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनमहाराज यांना प्रचाराच्या मैदानात उतरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सभेदरम्यान उदयनमहाराज यांनी हेलिकॉप्टरमधून घेतलेल्या एन्ट्रीची चर्चा सर्वत्र होत आहे.
बीडच्या परळीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उदयनमहाराज भोसले यांनी पंकजा मुंडेंससाठी प्रचारसभा घेतली. उदयनमहाराज हे हेलिकॉप्टरने परळीत दाखल झाले. यावेळी त्यांना पाहण्यासाठी हेलिपॅड असलेल्या ठिकाणी एकच गर्दी जमली होती. प्रचारात भाषण करताना उदयनमहाराज काहीसे भावुक झाल्याचे दिसून आले. यावेळी उपस्थितांनी त्यांना कॉलरस्टाईलसाठी मागणी केली. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर उदयनमहाराज यांनी बीडमध्ये देखील कॉलर उडवली. यावेळी कार्यकर्त्यानी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून जल्लोष केला. त्यांच्या या कृतीची बीडमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.