गेल्या काही दिवसांपासून भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध तणावाचे
बनले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर भारताने मालदीवमधले आपले सर्व सैन्य परत
बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. मालदीव सरकारने याबाबत माहिती दिली. भारताने
मालदीवमधून आपले सर्व सैन्य मागे घेतल्याचे मालदीव सरकारने म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोइझू यांनी मालदीवमधून सर्व भारतीय सैन्य मागे घेण्यासाठी
१० मे पर्यंत मुदत दिली होती.
चीन समर्थक नेता मानल्या जाणाऱ्या मुइझूने १० मे पर्यंत मालदीवमध्ये
असलेल्या भारतीय लष्करी जवानांना माघार घेण्याचा आग्रह धरल्यानंतर दोन्ही
देशांमधील संबंधांमध्ये तणाव वाढला होता. मालदीवमध्ये तैनात असलेल्या सुमारे ९०
भारतीय लष्करी जवानांना मायदेशी परत पाठवणे हा मोइज्जू यांच्या गेल्या वर्षीच्या
निवडणूक प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता.
भारताने भेट दिलेल्या दोन हेलिकॉप्टर
आणि डॉर्नियर विमानांच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी भारतीय लष्करी कर्मचारी
मालदीवमध्ये तैनात करण्यात आले होते. याआधी सोमवारी मालदीव सरकारने दोन तुकड्यांमध्ये
५१ सैनिकांना भारतात परत पाठवल्याची घोषणा केली होती. सरकारने अधिकृत कागदपत्रांचा
हवाला देत मालदीवमध्ये ८९ भारतीय सैनिकांची उपस्थिती असल्याची माहिती दिली होती.