काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत आहे. भाकरी भारताची खातात आणि चाकरी पाकिस्तानची करतात. शहिदांचा अपमान करणे आणि कसाबची बाजू घेणे हा काँग्रेसचा देशद्रोहीपणा आहे. बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्या उबाठांना काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना मनाची नाही तर जनाची लाज वाटायला हवी होती, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
पालघर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांच्या प्रचारासाठी वसईत आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते.
तीन वर्षांपूर्वी पालघरमध्ये साधू हत्याकांड झाले होते. त्या खटल्यात महाविकास आघाडी सरकारने आरोपींना पाठिशी घालून न्याय दिला नाही. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर एकाही साधू संतांना हात लावण्याची हिम्मत कोणी करू शकणार नाही, असे काम सरकारने केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, काश्मीरमध्ये कलम ३७० हटवले तेव्हा राहून गांधी यांनी रक्ताचे पाट वाहतील असे म्हटले होते. मात्र गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी आणि दहशतवादाची बोलती बंद करून टाकली. काश्मिर मोकळा श्वास घेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सहकार्यामुळे लाल चौकात तिरंगा फडकला आहे.
अयोध्येमध्ये राम मंदिरांचे 500 वर्षांपासूनचे भारतीयांचे स्वप्न होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न पूर्ण केले. त्यामुळे आपण जय श्रीराम बोलतो. पण विरोधकांना याची पोटदुखी झाली असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
डॉ. हेमंत सावरा हे हाडाचे डॉक्टर असल्याने ते विरोधकांचा चांगलाच इलाज करतील, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. मी डॉक्टर नसलो तरी दोन वर्षांपूर्वी मोठे सर्जिकल ऑपरेशन केले. यावेळी गृहमंत्री अमित शाह पाठीशी राहिले. त्यामुळे आपले सरकार राज्यात काम करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मशालीने आग लावण्याचे उद्योग पालघरमध्ये सुरू आहेत. येत्या ४ जून रोजी विरोधकांची तोंडे कायमची बंद करा, असे मतदारांना आवाहन करत मशाल कायमची विझवण्याची वेळ आली आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटावर केली.
देशाच्या सुरक्षेमध्ये गृहमंत्री अमित शाह यांनी कधीही तडजोड केली नाही. संसदेत भाषण करताना ते म्हणाले होते की, जम्मू काश्मिर आणि पाकव्याप्त काश्मिरमधील एक एक इंच जमीन आपली आहे आणि ती मिळविण्यासाठी प्रसंगी प्राण देऊ. भारताची एक इंच जमीन कोणास देणार नाही अशी सिंहगर्जना अमित शाह यांनी केली होती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत उबाठा गटाचे लोक शिव्या देतात. पण अमित शाह त्यांचेकडे बघत देखील नाहीत. जेव्हा अमित शाह तुमच्याकडे बघतील तेव्हा तुमचा सगळा कार्यक्रम होईल, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. काँग्रेससमोर लोटांगण घालणाऱ्या उबाठाने मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी देशद्रोही इकबाल मुसा याला प्रचारात उतरवले. या देशद्रोही पिलावळीला सोबत घेतलेले बघून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना होत असतील. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना नकली शिवसेना संबोधले आहे. कारण बाळासाहेबांचे विचार, धनुष्यबाण आणि राज्यातील जनतेचे प्रेम आपल्यासोबत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.