भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे काल कर्करोगामुळे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, काल उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सुशील कुमार मोदी यांचे पार्थिव आज त्यांच्या पाटणा येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तसेच दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
सुशील मोदी यांनी एप्रिल महिन्यात त्यांना कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती दिली होती. तसेच प्रकृतीच्या कारणामुळे यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नाही किंवा या निवडणुकीत सक्रीय सहभाग घेणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले होते. सुशील कुमार मोदी हे बिहारमधील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. बिहारच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होता. सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी बरीच वर्ष विद्यार्थी राजकारणात काम केले होते. आणीबाणीच्या काळातही त्यांनी मोठा लढा दिला होता.सुशील मोदी यांचे पार्थिव आज विशेष विमानाने पाटण्याला पोहोचणार आहे
जवळपास अडीच दशके ते बिहार भाजपचे प्रमुख होते. राज्यसभा, लोकसभा, विधानसभा आणि विधानपरिषदेत त्यांनी भाजपचे प्रतिनिधित्व केले. ते प्रदीर्घ काळ बिहारचे उपमुख्यमंत्रीही होते.