उपोषणबाबत पुन्हा एकदा जरांगेची मोठी घोषणा
मराठा आरक्षणासाठी आपण पुन्हा एकदा आंदोलनाला बसणार असल्याचे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जाहीर केले आहे. येत्या चार जून रोजी जरांगे नारायण गडावर सभा घेणार आहेत. त्यानंतर चार जून रोजी आपण उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
“माझा हा लढा मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आहे. मी ४ जूनपासून पुन्हा बेमुदत उपोषण करणार आहे. मुळात सर्वच पक्षात मराठा समाजाचे नेते आहेत. मराठा कोणताही असला तरी त्याला राज्य सरकारने दिलेल्या १० टक्के आरक्षणाचा कोणताही फायदा झालेला नाही.सरकारने १० टक्के आरक्षण दिलं आहे, पण ते अजूनही लागू झालेलं नाही”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
पुढे जरांगे म्हणाले की, “मला आता समाजाला आवाहन करण्याची गरज वाटत नाही. मराठा समाजाला आता सगळे माहिती आहे. एका मुलाप्रमाणे ते माझी काळजी घेतात. माझे उपोषण सुरु झाल्यानंतर मराठा समाज गावोगावी शांततेत आंदोलन करतील, असा मला विश्वास आहे”, असे ते म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही कुणाचा प्रचार केला नाही. कुणाला निवडून आणण्याचेही आम्ही आवाहन केले नाही तसेच आमचा महाविकास आघाडी किंवा महायुतीला पाठिंबा नव्हता. मी फक्त उमेदवारांना पाडण्याचे आवाहन केले असे स्पष्टीकरण मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिले आहे.