भाजपचे जेष्ठ नेते आणि स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून महाराष्ट्रातील दिंडोरी आणि कल्याणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. यानंतर संध्याकाळी मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत.
देशात होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा, प्रचार दौरे, रोड शो यांचा सपाटा लावला आहे. ‘अबकी बार चारसौ पार’ हे लक्ष्य सध्या करण्यासाठी ते आटोकाट प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. राज्यात आतापर्यंत चंद्रपूर, रामटेक, वर्धा, धारशिव, पुणे, लातूर, सोलापूर आदि ठिकाणी मोदी यांच्या सभा झाल्या आहेत. आता आज पंतप्रधान मोदी हे पुन्हा आज राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या मोदी यांच्या आजच्या कार्यक्रमानुसार, दुपारी पंतप्रधान मोदी हे दिंडोरी येथे एका सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी कल्याण येथे त्यांची प्रचारसभा सभा होणार आहे,
दिंडोरी आणि कल्याणमध्ये जाहीर सभा पार पडल्यावर मोदी सायंकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. घाटकोपर (प.)मधील एलबीएस मार्गावर अशोक सिल्क मिलपासून घाटकोपर पूर्व येथील पार्श्वनाथ मंदिरापर्यंत सुमारे अडीच किमी अंतरात हा रोड शो आयोजित करण्यात आला आहे.घाटकोपरचा हा सर्व भाग ईशान्य मुंबई मतदारसंघात येतो. मोदी यांचा ’रोड शो’ ईशान्य मुंबई मतदारसंघातील भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या मतदारसंघात होणार आहे. .
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, मुंबईतील सहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार यांच्यासह मंत्री, शहरातील सर्व आमदार-खासदार व अन्य पदाधिकारी रोड शो मध्ये सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या या रोड शोमुळे मुंबईतील सर्व जागांवर महायुतीच्या उमेदवारांसाठी चांगली वातावरण निर्मिती होईल, असा भाजप नेत्यांचा दावा आहे.तसेच मोदी यांची शिवाजी पार्क येथे १७ मे रोजी सभा होणार आहे.