देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने, वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
आज आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. देशातील सर्वात जास्त द्राक्ष आणि कांदा पिकवणारा मतदारसंघ म्हणून दिंडोरीची ओळख आहे. या ठिकाणी महायुतीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरवले आहे. तर, महाविकास आघाडीने भास्कर भगरे यांना दिंडोरीतून तिकीट दिले आहे.
कांदा निर्यातबंदी, पक्षांतर्गत नाराजी आणि मित्रपक्षांची नाराजी यामुळे यंदा दिंडोरिची जागा भाजपपुढे राखण्याचे कडवे आव्हान आहे. माकपने उमेदवार मागे घेतल्याने मत विभाजन या ठिकाणी टळले आहे. कृषी क्षेत्र असणाऱ्या या भागात भास्कर भगरे यांना तिकीट देऊन महाविकास आघाडीने यंदाची लढत अवघड केली आहे. दिंडोरीची जागा भाजपासाठी सुरक्षित मानली जाते. दिंडोरी लोकसभेत येणारे ६ च्या ६ विधानसभा मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यात आहेत. तर डॉ. भारती पवार यांनी केंद्रात मंत्रिपद देखील भूषविले आहे. त्यामुळे या ठिकाणी महायुतीची ताकद प्रचंड मोठी असल्याचे दिसून येत आहे.
मात्र या ठिकाणी कागदावर सगळे अनुकूल असल्याचे म्हटले जात आहे. यंदा दिंडोरीची निवडणूक भाजपाला थोडी आव्हानात्मक जाण्याची शक्यता आहे. नागरिकांशी इतका जनसंपर्क नसल्याने भारती पवार यांना संघटनेत नाराजीला सामोरे जावे लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक घटना अशा घडल्या की महायुतीत आलबेल नसल्याचे चित्र समोर आले होते. या भागात शेतकरी आणि शेतमजूर मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदीचा फटका भारती पवार यांना बसणार हा एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिक प्रश्न, कांदा निर्यातबंदी, पाणी टंचाई, रोजगाराचा अभाव, हे या ठिकाणचे महत्वाचे प्रश्न आहेत. मनमाड येथे २२ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. अनेक ठिकाणी तीव्र पाणी टंचाई आहे. रेल्वेगाड्यांवरून या ठिकाणी जनतेत रोष आहे. त्यामुळे या ठिकाणची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. दिंडोरीची जनता कोणाला साथ देते हे आपल्याला ४ तारखेला कळणारच आहे.