लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचार उद्या १८ मे रोजी संपणार आहे. मुंबईतील सहा जागांसह राज्यातील १३ जागांवर २० मे रोजी
पाचव्या टप्प्यातले मतदान होणार आहे. त्यासाठी आज शुक्रवारी मुंबईत प्रचाराचा धडाका बघायला मिळणार आहे.
राज्यात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसेचे राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येत आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची ही सभा आज संध्याकाळी पाच वाजता सभा शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या आधीच्या शिवाजी पार्कवरच्या सभा राज ठाकरे यांनी एक हाती गाजवल्या आहेत. त्यामुळे मोदीं समोर राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. महायुतीच्या ह्या सांगता सभेसाठी दादर परिसरातल्या वाहतुकीमध्येही बदल करण्यात आले आहेत.
तर महायुतीबरोबर महाआघाडीतील बड्या नेत्यांची आज मुंबईतच सभा पार पडणार आहे. या सभेला इंडिया आघाडीचे नेते उपस्थित असतील. . काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आपचे नेते अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. अरविंद केजरीवाल अंतरिम जामिनावर बाहेर आल्यानंतर इंडिया आघाडीची हि पहिलीच बैठक असणार आहे. ही सभा संध्याकाळी सहा वाजता बीकेसी मैदानावर होणार आहे.मात्र सभेला राहुल गांधी उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या आजच्या सभेचा टीझर जारी करण्यात आला आहे.