मागील २५ वर्ष सत्तेत असताना मुंबईकरांसाठी काही करता आले नाही. केवळ मतांसाठी मराठी माणूस म्हणणाऱ्या उबाठाला निवडणुकीत तडजोड करुन पाकिस्तानवादी अतिरेक्यांच्या ताब्यात मुंबई द्यायची आहे, अशी घणाघाती टीका मुंबईचे पालकमंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे . त्यामुळे सहानुभूतीवर न जाता वस्तुस्थिती पाहून मुंबईकरांनी डोळसपणे मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शिवसेना पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री दिपक केसरकर बोलत होते. यावेळी मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.
इंडिया आघाडीची पत्रकार परिषद आणि इतर प्रचार सभेत मुंबईचा विषय आला नाही. मुंबईच्या दृष्टीने ही महत्वाची निवडणूक असताना इंडिया आघाडीला मुंबईचे वावडे का, असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला. मुंबईसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कम्युनिस्टांविरोधात लढा दिला आणि ज्या ठिकाणी कम्युनिस्ट असतात तिथे गुंतवणूक येत नाहीत. मात्र महाराष्ट्रातून गुंतवणूक बाहेर गेली असे म्हणणाऱ्या उबाठाच्या प्रचार सभेत कम्युनिस्ट पक्षाचे लाल झेंडे दिसतात, असे मंत्री केसरकर म्हणाले आहेत .
बाळासाहेबांनी पाकिस्तानवादी शक्तींच्या विरोधात लढा दिला होता. ज्यावेळी भारत-पाकिस्तान मॅच व्हायची तेव्हा मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाके वाजवले जायचे हे बाळासाहेबांनी मुंबईतून हद्दपार केले. मात्र तुमच्या प्रचारात बॉम्बस्फोटातील आरोपी फिरत आहेत. बाळासाहेबांमुळे मुंबई सुरक्षित होती. मात्र आता निवडणुकीपुरता तडजोड कराल तर मुंबईकरांच्या हिताला मुकाल. असा इशारा केसरकर यांनी उबाठाला दिला.
मुंबादेवी, महालक्ष्मी आणि सिद्धीविनायक या तीन महत्वाच्या देवस्थांनासाठी महापालिकेत २५ वर्ष सत्तेत असताना उबाठाने काय केले असा सवाल त्यांनी केला. मुंबईतील हवेत सुधारणा, पायाभूत सेवा प्रकल्प, हॉस्पिटलचा कायापालट, कॉंक्रिटचे रस्ते, कोळीवाड्यांचा विकास, वरळीमध्ये जेट्टी याबाबत सत्तेत असताना निर्णय का घेऊ शकले नाहीत, यावर उद्धव ठाकरेंनी मुंबईकर जनतेला उत्तर द्यायला हवे, असे केसरकर म्हणाले. हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो याऐवजी देशभक्त असे बोलणाऱ्या उबाठाने मुंबईबाबत विचारलेल्या प्रश्नांवर गुळमुळीत उत्तरे देऊन मतदारांची दिशाभूल करु नये, असे केसकर म्हणाले.
महायुतीचे हिंदुत्व हे नोकऱ्या देणारे आहे. मात्र मुंबईतील नोकऱ्यांबाबत आदित्य ठाकरे यांनी काय केले. मुंबईची सिस्टर सिटी जर्मनीमधील स्टुटगार्ट शहर आहे मात्र तेथे मराठी तरुणांना नोकऱ्या का दिल्या नाहीत, याचेही उत्तर उबाठाने द्यायला हवे. यासंदर्भात महायुती सरकारने निर्णय घेऊन चार लाख तरुणांना नोकरीचे करारपत्र सुपूर्द केले.जर्मनीतील सहा शहरांमध्ये मराठी तरुणांसाठी नोकरी आणि फॅमिली व्हिसा देण्याचा करार करण्यात आला.
पश्चिम महाराष्ट्रातील जनता महायुतीच्या पाठिशी
पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश लोक मुंबई, नवी मुंबई परिसरात कामानिमित्त स्थायिक झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात मागील दोन वर्षात महायुती सरकारकडून विकास कामे झाली आहेत. त्यामुळे मुंबईतील सहाही जागांच्या विजयांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जनतेचा मोठा वाटा असेल, असा विश्वास यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे .