केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांनी आज मुंबईत 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले. काँग्रेसकडून भूषण पाटील यांच्या विरोधात पियुष गोयल उभे आहेत.
मुंबईतील एका मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर गोयल पत्रकारांना म्हणाले की , “मुंबई आणि उर्वरित देशात आज पाचव्या टप्प्याचे मतदान सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्याप्रमाणे लोकशाहीच्या उत्सवात प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे सांगितले होते. मला विश्वास आहे की आज मुंबईतील लोक मोठ्या संख्येने बाहेर पडतील आणि मतदानाचा हक्क बजावतील.”
“सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झाल्यापासून उत्तर मुंबईत लोकांच्या लांबच लांब रांगा मी पाहिल्या. त्यामुळे देशातील नागरिक आणि मुंबईकर येतील आणि आपले कर्तव्य पार पाडतील,असा माझा विश्वास आहे.
पियुष गोयल हे ह्यावेळी पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत. “या निवडणुकीमुळे मला अनेक लोकांना भेटण्याची आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली आहे. एक मुंबईकर असल्याने, लोकांनी मला ज्या प्रकारे आदर दिला आहे, तो एक विशेष अनुभव होता.माझे कुटुंबीय मतदानाचा हक्क बजावण्यासाठी परदेशातून आले आहेत,” असेही गोयल यांनी सांगितले.
आज मुंबईतील सहासह महाराष्ट्रातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू आहे. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या जागा आहेत.तर महाराष्ट्रातील इतर मतदारसंघांमध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, कल्याण, पालघर, भिवंडी आणि ठाणे यांचा समावेश आहे.