लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान सुरु आहे. राज्यातील शेवटच्या टप्प्यात मुंबई महानगर क्षेत्रातील दहा मतदारसंघांसह नाशिक, धुळे आणि दिंडोरी या जागांवर मतदान होत आहे. सर्वसामान्यांसह विविध सेलिब्रिटीसुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर पोचले आहेत. मात्र काही ठिकाणी मतदारांना निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराला सामोरे जावे लागते आहे. हाच प्रकार .अभिनेते आदेश बांदेकर यांच्याबरोबर घडला असल्याने त्यांनी इन्स्टाग्रामवर लाइव्ह करत संताप व्यक्त केला आहे. पवईतील एका मतदान केंद्रावरून त्यांनी हे लाइव्ह केले आहे.
“लोकशाहीचा हा उत्सव आहे. पाच वर्षांपासून यासाठी तयारी केली जाते. पण इथे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. इथले लोक खूप चिडले आहेत.“मी आता पवईतील एका मतदान केंद्रावर आहे. मी स्वत: दोन-तीन तासांपासून थांबलोय. मला माझ्या मतदानाचा हक्क बजावायचा आहे. पण मशीन बंद पडतात आणि दोन-दोन तास त्यावर काही उपाय केला जात नाही. , हे अत्यंत वाईट आहे”, अशा शब्दांत बांदेकरांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
57 आणि 58 या दोन्ही मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असल्याचे ते लाइव्हमध्ये म्हणाले आहेत. पुढे ते म्हणले आहेत. ” हिरानंदानीसारखा सुशिक्षित परिसर असूनही इकडच्या 57, 58 या दोन्ही पोलिंग बूथवरील याद्या बंद झाल्या आहेत. सगळ्या मशिनरी बंद आहेत. तीन-तीन तास प्रतीक्षा केल्यानंतर काहीजण घरी जात आहेत. दोन तासांपासून आम्ही उन्हात प्रतीक्षा करतोय. पण कोणी उत्तरच देत नाहीये. वयस्कर मतदार प्रतीक्षा करून घरी परतत आहेत.” या लाइव्हदरम्यान बांदेकरांनी रांगेत उभ्या असलेल्या मतदारांनाही प्रतिक्रिया विचारल्या आहेत. त्यांनीसुद्धा याविषयी संताप व्यक्त केला आहे.