मान्सून संदर्भात देशवासियांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बंगालचा उपसागर, अंदमान निकोबार बेटांचा काही भाग या ठिकाणी नैऋत्य मान्सून दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही तासांमध्ये अंदमान – निकोबार बेटांवर मुसळधार पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. मान्सून अंदमान निकोबार बेटांवर दाखल झाल्याने देशातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
मान्सून अंदमानात योग्य वेळेत दाखल झाल्याचे समजते आहे. दरम्यान ३१ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तीन ते चार दिवस पुढे मागे होण्याची शक्यता आहे. ८ ते १० जूनपर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान गेले काही दिवस राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उन्हाचा तडाखा तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे. त्यामुळे अवकाळी पावसामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. शेतीचे नुकसान होत आहे. २१ ते २२ तारखेपर्यंत अवकाळीचा फटका राज्यातील काही भागात बसण्याची शक्यता आहे.