उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 14 जागांसाठी उद्या म्हणजे शनिवारी मतदान पार पडणार आहे. उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यातील 14 जागांमध्ये सुलतानपूर, प्रतापगड, फुलपूर, अलाहाबाद, आंबेडकरनगर, श्रावस्ती, डुमरियागंज, बस्ती, संत कबीरनगर, लालगंज (SU), आझमगढ, जौनपूर, मच्छलीशहर (SU) आणि भदोही यांचा समावेश आहे. सहाव्या टप्प्यातील 14 जागांसाठी एकूण 162 उमेदवार रिंगणात आहेत. ज्यामध्ये 146 पुरुष आणि 16 महिला उमेदवार आहेत. त्याचवेळी गानसडी विधानसभेच्या रिक्त जागेसाठीही शनिवारी मतदान होणार आहे. सहाव्या टप्प्यात 14 जागांवर 2.7 कोटींहून अधिक मतदार आहेत. अनेक जागांवर चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
सहाव्या टप्प्यात प्रामुख्याने सुलतानपूरमधून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी, आझमगडमधून भाजपचे दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ आणि सपाचे धर्मेंद्र यादव, श्रावस्तीतून भाजपचे साकेत मिश्रा, डुमरियागंजमधून भाजपचे जगदंबिका पाल, अलाहाबादचे नीरज त्रिपाठी जौनपूरमधून काँग्रेसचे उज्ज्वल रमण सिंह आणि भाजपच्या तिकीटावर कृपाशंकर सिंह हे जौनपूरमधून रिंगणात आहेत.
भाजपने ८ जागांवर आपल्या मागच्या वेळच्याच उमेदवारांना उतरवले आहे. तर भदोही, श्रावस्ती, आंबेडकर नगर, अलाहाबाद, फुलपूर आणि जौनपूर या 6 जागांवर नवीन चेहरे उतरवण्यात आले आहेत.
20 मे रोजी राज्यात पाचव्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी 57.98 टक्के होती.यावेळी एनडीए, इंडिया ब्लॉक आणि बहुजन समाज पार्टी (बीएसपी) यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात क्लीन स्वीप करून भाजपला 9 जागांवर विजयाची हॅट्ट्रिक साधायची आहे