लोकसभा निवडणुकीसाठी उद्या ६ व्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात सभा घेत
आहे. आज नरेंद्र मोदी हे पंजाबी आणि हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. दरमयान
हिमाचल प्रदेशमधील सिमला येथील एनडीएच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी
मोदींनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीका केली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि
इंडी आघाडी स्वार्थी आणि संधीसाधू असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, ”काँग्रेस
हा जातीयवादी आणि कुटुंबावर आधारित पक्ष आहे. काँग्रेस आणि त्यांच्या
मित्रपक्षांना एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण हिसकावून त्यांच्या खास व्होट बँकेला
द्यायचे आहे. संविधान निर्माते डॉ.भीमराव आंबेडकर यांनी आरक्षणाची तरतूद केली पण
काँग्रेसवाल्यांना ती रद्द करून त्यांची व्होट बँक मुस्लिम जिहादींना द्यायची आहे.”
सिमला लोकसभा मतदारसंघातील नाहान येथे
शुक्रवारी भाजपचे उमेदवार सुरेश कश्यप यांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या निवडणूक
रॅलीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”काँग्रेस सरकारने कर्नाटकात हे केले
आहे आणि ओबीसींचे अधिकार काढून ते मुस्लिमांना दिले आहेत. पश्चिम बंगालमध्येही हेच
दिसून आले आहे. पश्चिम बंगाल सरकारने ७७ मुस्लिम जातींना ओबीसी आरक्षण दिले होते.
दोन दिवसांपूर्वी कलकत्ता उच्च न्यायालयाने ७७ मुस्लिम जातींचे आरक्षण रद्द
केले. मात्र तेथील मुख्यमंत्री उच्च
न्यायालयाच्या आदेशाचेही पालन करत नसून तिथे राज्यघटनेची पायमल्ली केली जात आहे.
इंडी आघाडीतील घटक पक्ष आपल्या व्होट बँकेला खूश करण्यासाठी असे प्रकार करत आहेत.