पुण्यातील कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दुचाकीला धडक दिली. यात दोघांचा मृत्यू झाला. दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसाद सर्व स्तरातून उमटले. विरोधी पक्षाकडून देखील या घटनेप्रकरणी आक्रमक भूमिका समोर येत आहेत.
याप्रकरणी सध्या अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर आरोपीच्या वडिलांनाही अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पब मालकांवरही गुन्हा दाखल करत त्यांनाही अटक केली आहे. तर नुकतेच अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेन्द्र आग्रवाल यांना देखील अटक करण्यात आली आहे.
या संपूर्ण घटनेवर प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे. “घरात एवढा पैसा झाल्यावर रस्त्यावर अशी मस्ती येते. पैशामुळे असे लोभी लोक माणुसकी विसरत चालले आहेत. असे पैसे उधळणे अशा प्रकारे बेदरकारपणे कार चालवणे चुकीचे आहे. डान्सबार आणि पबमध्ये जाणारा वर्ग बघितला तर हा प्रचंड पैसा असणारा वर्ग आहे. शौकीन लोक हे पैशाच्या माध्यमातून माणुसकी विसरलेले आहेत,” अशा शब्दात बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे