लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे टप्पे संपत आले आहेत. ६ टप्प्यातील
मतदान पूर्ण झाले आहे. ७ व्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. त्यानंतर ४
जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी
पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते. प्रचार सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी
ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली आहे. ममता सरकारने केवळ अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण
केले असून ओबीसींचा विश्वासघात केला आहे, असे मोदी म्हणाले. मोदी आज बंगालच्या
उत्तर २४ परगणा येथे बोलत होते.
प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ”आपण सर्वांनी
मिळून चक्रीवादळाचा सामना केला आहे. एनडीआरएफ आणि इतर पथकांनी चांगले काम केले
आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करत आहे. आज भारत विकासाच्या
मार्गावर सुरू झाला आहे. भाजप सरकारने गेल्या 60-70 वर्षांत जितका
खर्च केला आहे त्यापेक्षा जास्त खर्च गेल्या १० वर्षांत पूर्व भारतावर केला आहे.”
पुढे बोलताना मोदी म्हणाले, ”पश्चिम
बंगालच्या एका भागात कोळसा आणि इतर खनिज संपत्ती आहे आणि दुसऱ्या बाजूला मोठी
किनारपट्टी आहे. एक काळ असा होता जेव्हा बंगाल लाखो देशवासीयांना रोजगार देत असे.
आज बंगालमधील बहुतेक कारखाने बंद आहेत, तरुणांना स्थलांतर करावे लागले आहे.
बंगालची ही दुर्दशा, कोणी केली हा विनाश? आधी काँग्रेसने बंगाल लुटला, नंतर
डाव्यांनी लुटला आणि आता तृणमूल दोन्ही हातांनी लुटत आहे.काँग्रेस, सीपीआय(एम),
तृणमूल
हे तिघेही पश्चिम बंगालचे गुन्हेगार आहेत.”