झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे सध्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडी कोठडीत आहेत. दरम्यान त्यांनी जामीन मिळावा यासाठी अनेकदा याचिका कोर्टात दाखल केल्या होत्या. मात्र त्यांना दिलासा मिळताना दिसत नाहीये. पीएमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश राजीव रंजन यांच्या न्यायालयाने गुरुवारी (३० मे) बडगई परिसरातील ८.४६ एकर जमीन घोटाळ्यात सहभागी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह ८ आरोपींच्या न्यायालयीन कोठडीची मुदत वाढवली. यापूर्वी तुरुंगात असलेल्या हेमंत सोरेन यांना गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर करण्यात आले.
हेमंत सोरेन, निलंबित महसूल कर्मचारी भानू प्रताप प्रसाद, जेएमएम नेते अंतू तिर्की, अफसर अली, विपिन सिंग, प्रियरंजन सहाय आणि इरसद अख्तर यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत १३ जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. पुढील हजेरी १३ जूनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच होणार आहे. जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी केल्यानंतर ३१ जानेवारी रोजी ईडीने राजीनामा दिल्यानंतर हेमंत सोरेन यांना अटक करून कोर्टात हजर केले होते. त्यानंतर त्यांना पीएमएलए कोर्टाने ईडी कोठडी सुनावली होती.