लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल काल जाहीर झाले. देशातील जनतेने आपला कौल दिला असून त्यामध्ये कुठल्याही एकापक्षाला स्पष्ट बहुमत दिलेले नाही. पण भाजपाप्रणीत NDA कडे बहुमताच्या मॅजिक फिगरपेक्षा जास्त जागा आहेत. मात्र केंद्रात सत्ता स्थापनेसाठी 272 खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. भाजपाप्रणीत एनडीकडे 292 खासदार आहेत. तर काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीकडे 234 खासदार आहेत.
या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप पक्षाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आपण सत्ता स्थापन करणार असल्याचे काल जाहीर केले आहे तर इंडिया आघाडीनेही सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.
आता या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत राजकीय हालचालींना वेग येणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडणार आहे. त्याचबरोबर एनडीए आणि इंडिया आघाडीची बैठक पार पडणार आहे. केंद्रात सत्ता स्थापनेत आंध्र प्रदेशच्या तेलगु देसम पार्टी TDP चे चंद्राबाबू नायडू आणि बिहारमधील जनता दल युनायटेडचे नितीश कुमार यांची मुख्य भूमिका राहणार आहे. भाजपाचे तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न या दोन नेत्यांवर अवलंबून असणार आहे.
आज इंडिया आघाडीची संध्याकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे, त्यात विरोधी पक्षात बसायचे की, सरकार स्थापनेचा दावा करायचा? याची रणनिती ठरेल . इंडिया आघाडीमध्ये जवळपास 20 पक्ष आहेत.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी आज ही इंडिया आघाडीची बैठक होईल. बैठकीत पंतप्रधान पदाच्या चेहऱ्यासाठी चर्चा होऊ शकते. महाराष्ट्रातून शरद पवार आणि उद्धव ठाकरे दिल्लीत होणाऱ्या या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी होणाऱ्या या बैठकीसाठी सगळ्या घटक पक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे.
तर दुसऱ्या बाजूला NDA ची सुद्धा आज बैठक होणार आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.आजच्या बैठकीत शपथविधीबाबत चर्चा होवू शकते.भाजपमधील वरिष्ठ नेते आणि मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज संध्याकाळी होणाऱ्या NDA च्या बैठकीपूर्वी कॅबिनेट बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.