टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेत भारतीय ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदने चमकदार कामगिरी करत विश्वविजेत्या डिंग लिरेनचा पराभव केला आहे.चौथ्या फेरीत त्याला प्रज्ञानंदने पराभूत केलेआणि या विजयासह प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला मागे टाकले आहे. तो नंबर-१ ग्रँड मास्टर बनला आहे. प्रज्ञानंदने गेल्या वर्षीही याच स्पर्धेत डिंगचा पराभव केला होता.
या विजयासह प्रज्ञानंदने विश्वनाथन आनंदला रेटिंगच्या बाबतीत मागे टाकले आहे. प्रज्ञानंद FIDE च्या लाइव्ह रँकिंगमध्ये 11 व्या क्रमांकावर पोचला आहे . त्याचे 2748.3 गुण आहेत. तर विश्वनाथन आनंद 12 व्या क्रमांकावर आहे.
या विक्रमा नंतर प्रज्ञानंदने आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मला वाटतं, जर तुम्ही अशा बलाढ्य खेळाडूला हरवले तर ते नेहमीच खास असते कारण त्यांना पराभूत करणे फार सोपे नसते बुद्धिबळात विश्वविजेत्याविरुद्ध पहिल्यांदाच जिंकणे ही एक विशेष भावना आहे.”
ग्रँड मास्टर आर प्रज्ञानंदच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. 2016 मध्ये तो सर्वात तरुण आंतरराष्ट्रीय मास्टर बनला. वयाच्या अवघ्या 10 वर्षे 10 महिन्यांत आर प्रज्ञानंदनी ही कामगिरी केली होती. 2017 मध्ये तो पहिल्यांदा ग्रँड मास्टर झाला. त्याची मोठी बहीण आर वैशाली देखील ग्रँडमास्टर आहे.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही या विशेष कामगिरीबद्दल आर प्रज्ञानंदचे कौतुक करत एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या आगामी सामन्यांसाठी शुभेच्छा देत आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये प्रज्ञानंदने भारताला अश्याच प्रकारे गौरव मिळवून द्यावा अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.