आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सला अखेर सूर गवसला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात यंदा मुंबईने पहिला विजय अखेर प्राप्त केला आहे. २९ धावांनी मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. मुंबईला पहिल्या तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर अखेर मुंबईने विजय प्राप्त केला आहे. पहिल्या तीन सामन्यात हार्दिक पंड्या हुटींगला सामोरे जावे लागले. मात्र कालच्या सामन्यात चाहत्यांनी हार्दिकला सपोर्ट केलेला दिसून आला. त्यामुळे त्यालाही थोडा दिलासा मिळाला असेल. मात्र हुटींग न होण्यामागे तिथे १८,००० शाळेतील मुले उपस्थित होते, हे देखील कारण असण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून मुंबईला फलंदाजीचे निमंत्रण दिले. सुरुवातीला रोहित आणि ईशान या सलामीच्या जोडीने सुरुवात चांगली केली. त्यानंतर मुंबईचा डाव थोडा गडगडला होता. मात्र त्यानंतर हार्दिक आणि टीम डेव्हिड आणि शेवटच्या ७ ते ८ चेंडूत शेफर्ड याने केलेली तुफान फटकेबाजी यावर मुंबईने २३४ धावांचा डोंगर उभा केला.
त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स जेव्हा फलंदाजीला आल्यावर पृथ्वी शॉ ने ६६ धावांची खेळी केली. मात्र भेदक गोलंदाज जसप्रीत बुमराहने जबरदस्त यॉर्कर टाकून पृथ्वीला बाद केले. त्यानंतर मुंबईच्या बॉलर्सनी चांगली गोलंदाजी करत यंदाच्या हंगामातील मुंबईला पहिला विजय मिळवून दिला. त्यामुळे मुंबईच्या संघाला आणि व्यवस्थपनाला दिलासा मिळाला आहे.