आयपीएलच्या स्पर्धेत आज गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना होणार आहे. सध्या पॉईंट्स टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स पहिल्या नंबरवर तर गुजरात टायटन्स ७ व्या नंबरवर आहे. आज गुजरात राजस्थानचा विजयी रथ रोखून आजचा सामना जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसेल. शुभमन गिल गुजरात टायटन्सचा तर संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे. राजस्थान रॉयल्स देखील आपल विजयाची मालिका कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल.
आयपीएलच्या १७ व्या हंगामात राजस्थान रॉयल्स हा संघ पराभूत झालेला नाही. त्यांनी आपल्या चारही सामन्यात विजय मिळविला आहे. तर गुजरात टायटन्स ७ व्या नंबरवर आहे. यामध्ये त्यांनी पाच पैकी दोन च सामने आतापर्यंत जिंकले आहेत. यंदाच्या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचे पारडे जड राहिले आहे. राजस्थान गोलंदाज आणि फलंदाज या दोन्ही स्तरावर उत्तम खेळी करत आहेत. यशस्वी जैस्वालचा फॉर्म थोडासा चिंतेचा विषय आहे. मात्र जॉस बटलर, कर्णधार संजू सॅमसन, रियन पराग हे जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत.
दुसऱ्या बाजूला पाहिल्यास गुजरात टायटन्सचा संघ देखील संतुलित आहे. आकडेवारी पाहिल्यास गुजरातचा संघ वरचढ असल्याचे दिसून येते. आतापर्यंत ५ वेळा राजस्थान आणि गुजरात आमनेसामने आले आहेत. त्यातील केवळ १ च सामना राजस्थानला जिंकता आला आहे. त्यामुळे आकडेवारीत शुभमन गिलचा गुजरात टायटन्स संघ वजनदार असल्याचे पाहायला मिळत आहे.