भारतीय शटलर आणि विश्वविजेती पीव्ही सिंधूने शनिवारी थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा पराभव करून मलेशिया मास्टर्स २०२४ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
तिने महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत बुसानन ओंगबामरुंगफानचा 13-21, 21-16, 21-12 असा पराभव केला. 2023 च्या स्पेन मास्टर्सनंतर स्पर्धेची ही तिची पहिली अंतिम फेरी आहे.
सिंधूने पहिला सेट 13-21 असा गमावला पण पुढच्या दोन सेटमध्ये दमदार पुनरागमन करत तिने स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. भारतीय शटलरने शेवटच्या दोन सेटमध्ये २१-१६ आणि २१-१२ असे वर्चस्व राखले.
रविवारी खेळल्या जाणाऱ्या अंतिम फेरीत सिंधूचा सामना चीनच्या वांग झियाशी होणार आहे.
सिंधूने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत चीनची जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकाची शटलर हान यू हिला पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिने 55 मिनिटे चाललेल्या या लढतीत तिच्या चिनी प्रतिस्पर्ध्याचा 13-21, 21-14 आणि 12-21 असा पराभव केला.
स्पर्धेच्या सुरुवातीला, सिमरन सिंघी आणि रितिका ठाकरे या भारतीय महिला दुहेरीच्या जोडीला दुसऱ्या फेरीतील पर्ली टॅन आणि थिनाह मुरलीधरन या मलेशियाच्या जोडीकडून 21-17, 21-11 असा पराभव पत्करावा लागला.
मलेशिया मास्टर्स 21 ते 26 मे दरम्यान क्वालालंपूर, मलेशिया येथे आयोजित केलेली आहे. . ही बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) वर्ल्ड टूर सुपर 500 स्तरीय स्पर्धा आहे. पीव्ही सिंधूने 2013 आणि 2016 मध्ये दोनदा स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे, तर सायना नेहवालने 2017 मध्ये विजेतेपद मिळवले आहे.